लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फेरबदलाची सुरुवात झाली असून, पक्षाने महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांचा राजीनामा मागितला असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. पक्षाने राजीनामा घेतल्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी तीन महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी हा राजीनामा घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे काही महिन्यांपासून कल्पना पाटील यांच्या विषयी पक्षातुनच तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच एकाच घरातील व्यक्तींना दोन महत्वाची पदे देण्यात आल्याने देखील पक्षातील काही पदाधिकारी नाराज होते. याबाबत देखील पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी वाढत जात असून, खडसे यांच्या प्रवेशानंतर त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना देखील पक्षात मोठ्या जबाबदारी देण्यासाठीही हे बदल करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात पक्षात अनेक बदल होण्याची शक्यता असून, मुख्य बदल महानगर राष्ट्रवादीत होणार असल्याचीही माहिती राष्ट्रवादीतील एका बड्या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले.
कोट...
पक्षाने राजीनामा मागितला नसून, आपण स्वत:हून राजीनामा देणार आहोत. पक्षाकडून कोणताही दबाव नाही. नव्या कार्यकर्त्यांना देखील संधी मिळावी म्हणूनच राजीनामा देणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार आहे. तीन वर्षांपासून महिला जिल्हाध्यक्ष पद मी सांभाळत आले आहे. माझा कार्यकाळ देखील आता संपल्याने हा निर्णय घेतला.
-कल्पना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस