लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या कार्यपध्दतीवर नाराज होऊन तब्बल १३ संचालकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. १३ संचालकांनी सामूहिकपणे राजीनाम्याचा पत्रावर स्वाक्षरी केली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्ह्याबाहेर असल्याने संचालकांनी आपले राजीनामे खिशातच ठेवले आहेत.
पालकमंत्री शुक्रवारी जिल्ह्यात येणार असून, त्यांची भेट घेतल्यानंतरच राजीनामा देण्यात येणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे. तसेच सभापतींच्या कारभाराविरोधात सदस्य आक्रमक असून, गेल्या पाच वर्षात तीन सभापतींविरोधात संचालकांनी अविश्वास आणला असून, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपली आहे. मात्र, कोरोनामुळे विद्यमान संचालक मंडळाला मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संचालकांनी राजीनामे दिल्यास सभापतींचे अधिकार रद्दबातल होतील व बाजार समितीवर निवडणूक लागेपर्यंत प्रशासक नेमण्यात येण्याची शक्यता आहे.
‘कॉम्प्लेक्स’च्या बांधकामानंतर बदलले राजकारण
१. बाजार समितीच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी कृउबासने विकासक पराग कन्स्ट्रक्शनशी करार केलेला आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून बाजार समितीतील राजकारण ‘कॉम्प्लेक्स’भोवती फिरत आहे. या ‘कॉम्प्लेक्स’च्या बांधकामाला मनपा प्रशासनाने परवानगी नाकारली होती. विकास नियंत्रक नियमावलीच्या आधारातील निकषात बाजार समितीचे प्रस्तावित संकुल बसत नसल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
२. पुणे येथील नगररचना विभागाकडून या कामाला मंजुरी आणण्यात आली. त्यातच १८४ दुकानांची परवानगी असताना १९२ दुकाने बांधण्यात आली आहेत अशी चर्चा होती. या ‘कॉम्प्लेक्स’मध्ये दुकाने घेण्यावरूनच संचालकांमध्ये वाद सुरू असून, त्याचे पडसाद वेळोवेळी पाहायला मिळत आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन सभापती प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये लक्ष्मण पाटील यांच्यावर तर आता कैलास चौधरी यांच्या विरोधात सर्वपक्षीय संचालक एकवटले आहेत.
३. ‘कॉम्प्लेक्स’मध्ये गाळे मिळावेत यासाठीच सर्व संचालकांमध्येच एक प्रकारे स्पर्धाच सुरू असून, त्यावरून हे खटके उडाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आताही ‘कॉम्प्लेक्स’च्या मुद्द्यावरून सभापती व संचालकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. काही गाळे परस्पर विक्री केल्याचाही आरोप काही संचालकांकडून केला जात असून, याबाबत पालकमंत्र्यांकडे सभापतींची तक्रार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पालकमंत्री नाराजी दूर करतील का?
कैलास चौधरी हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. अशा परिस्थितीत संचालकांकडून सभापतींविरोधात भूमिका घेतल्याने पालकमंत्री नाराज संचालकांची नाराजी दूर करतात की नाही? याकडे लक्ष लागले आहे. पाळधी येथील निवासस्थानी जाऊन संचालक पालकमंत्र्यांची भेट घेणार असून, या बैठकीनंतरच संचालक आपली भूमिका जाहीर करणार आहेत. प्रभाकर सोनवणे, यमुना सपकाळे, शशिकांत बियाणी, नितीन बेहळे या संचालकांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
पक्षीय बलाबल असे
एकूण संचालक - १८
शिवसेना - ६
भाजप - ५
शेतकरी विकास पॅनल - ४
व्यापारी संचालक - २
अपात्र - १
राजीनामा देण्याच्या तयारीत असलेले संचालक
भाजप - ५
शिवसेना - ५
शेतकरी विकास पॅनल - ३