आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ : पाचशे मीटरच्या निर्णयामुळे प्रभात चौकातून स्थलांतरीत झालेले दारु दुकान आता पुन्हा त्याच जागी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्याने रहिवाशांनी या दुकानाला कडाडून विरोध केला आहे. बुधवारी शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेली दारु दुकाने बंद केली होती. त्यामुळे या भागातील दुकान रामानंद नगर भागात स्थलांतरीत झाले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयात बदल झाल्याने पुन्हा त्याच ठिकाणी दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची माहिती रहिवाशांना मिळाल्याने त्यांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येऊन आंदोलन केले. महामार्गाला लागून असल्याने अपघाताचा धोका तसेच महिलांशी अश्लिल वर्तन करणाºयांची संख्या अधिक असते, अशा तक्रारी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या.
दरम्यान, दुय्यम निरीक्षक सी.एच.पाटील यांनी घटनास्थळी जाऊन रहिवाशांच्या भावना समजून घेतल्या. शंभराच्यावर लोकांनी त्यांना लेखी विरोध केला. यात महिलांची संख्या अधिक होती. या लोकांचा त्यांनी जबाब नोंदवून घेत त्याचा अहवाल सायंकाळीच अधीक्षक एस.एल.आढाव यांच्याकडे सादर केला.
नगरसेवक रवींद्र पाटील, पी.ई.पाटील, गिरीश चौधरी, हेमा सोनाळकर, सुनील सोनाळकर, राजेश कोठारी, गोरख महाजन, मिलिंद कोल्हे, वैशाली प्रदीप पाटील, राजश्री सरोदे, रमेश बोंडे,कांतीलाल राणे, मिनल पाटील यांच्यासह १३७ जणांच्या स्वाक्षरीचे निवेदन अधिकाºयांना देण्यात आले.