चोपडा,दि.7- तालुक्यातील सत्रासेन येथे वनरक्षकास किरकोळ कारणावरून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनरक्षक प्रवीणकुमार रघुनाथ निकम हे सत्रासेन येथे वनविभागाच्या कार्यालयात काम करीत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सत्रासेन येथील चार युवक कार्यालयाच्या आवारात घुसून त्यांनी तेथील लिंबुच्या झाडावरील लिंबू तोडू लागले. लिंबू तोडण्यास निकम यांनी मज्जाव केला असता, चौघांनी त्यांना चापटा बुक्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत, सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी वनरक्षक प्रवीणकुमार निकम यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशीरा दिलेल्या फिर्यादीवरून हरदास भाईदास पावरा, जयदास भाईदास पावरा, रोहिदास गंगाराम पावरा, गुल्या गंभीर पावरा (सर्व रा. सत्रासेन) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केवलसिंग पावरा हे करीत आहेत .