चोपडा,दि.24- सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढवावा, विवाहाच्या आदल्या रात्री डी.जे. वाजविणे बंद करावे, विवाहात अक्षता ऐवजी फुलांचा वापर करावा या स्वरुपाचे ठराव रविवारी झालेल्या क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात यांच्या 29 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आले. धानोरा येथे सूर्यवंशी गुजर समाज मंडळाच्या मंगल कायार्लायत दोन सत्रात मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ देवचंद महाजन यांचे अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झाले. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती माणिकराव महाजन, विद्यमान पंचायत समिती सदस्यां कल्पना दिनेश पाटील, धानोरा सरपंच कीर्ती पाटील, जि.प. सदस्य नाना महाजन, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांचे हस्ते संत सावता महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. दुपारचे सत्र मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ महाजन मुंबई, यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रास्ताविक किशोर महाजन, सूत्रसंचालन प्रवीण माळी व चित्रा माळी यांनी तर आभार ह भ प माधवराव महाराज यांनी मानले. या अधिवेशनात तीनही राज्यातून समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
माळी समाजाच्या अधिवेशनात विवाह सोहळ्यात अक्षताऐवजी फुलांच्या वापराचा ठराव
By admin | Published: April 24, 2017 12:10 PM