आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२७-परीक्षा संपल्यानंतर प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या थेट हातात देवून संबंधित विषयांच्या प्राध्यापकांसमोर जागीच त्यांच्या शंकांचे निरसन करणारा ‘ओपन डे’ हा आगळा-वेगळा उपक्रम उत्तर महाराष्ट विद्यापीठाने सुरु केला आहे.यामुळे निकाल जाहीर होण्याआधीच विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची माहिती मिळणार आहे. परीक्षा व निकालांमध्ये अधिक पारदर्शीपणा यावा यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम सुरु केल्याची माहिती उमविचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुंबईच्या राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर, परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील आदी उपस्थित होते.
भौतिकीयेशास्त्र प्रशाळेत स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभशासनाच्या अग्रवाल समितीने परीक्षेसंदर्भात यापूर्वी काही शिफारसी केल्या असून या समितीच्या अहवालातील बहुतांश सूचना उमविने राबविल्या आहेत. या समितीने परीक्षेतील पारदर्शीपणाबाबत शिफारस केली होती. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या भौतिकीयेशास्त्र प्रशाळेत ‘ओपन डे’ या उपक्रमाचा सोमवारपासून शुभारंभ करण्यात आला. या प्रकारचा उपक्रम सुरु करणारे उत्तर महाराष्ट विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे.
तज्ज्ञांकडून केले जाईल निरसनदरम्यान, विद्यार्थ्यांच्या हातात उत्तरपत्रिका देण्यात येतील त्यावेळी संबधित विषयाचे तज्ज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत. सोमवारी डॉ.अजित पाटणकर हे सभागृहात तज्ज्ञ म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कडूनही शंकांचे निरसन करुन घेतले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे स्वत:भौतिकीयेशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे ते या ‘ओपन डे’ साठी पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना थेट उत्तरपत्रिका बघायला मिळून समोरासमोर शंकांचे निरसन केले जात असल्यामुळे आपल्या चुका लक्षात येत होत्या.
पुर्नमुल्यांकनासाठीचा विद्यार्थ्यांचा खर्च वाचेलपरीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना आपल्या उत्तर पत्रिकांची फोटोकॉपी किंवा पुर्नमुल्यांकन करण्यासाठी अर्ज केले जातात. या सर्व प्रक्रियेला खर्च व वेळ देखील मोठ्या प्रमाणात लागतो. मात्र या उपक्रमामुळे हा खर्च वाचणार आहे. या पध्दतीमुळे अत्यंत पारदर्शीपणा राहिल तसेच सर्व शिक्षकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेवावी लागतील. प्राध्यापकांना अपडेट राहावे लागेल. संपूर्ण अभ्यासक्रम हा शिकवावा लागेल आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांकडून पेपर तपासणी व्यवस्थित होत नाही असे असलेले आक्षेप संपुष्टात येतील.
सर्व प्रशाळांमध्ये राबविला जाईल उपक्रमविद्यापीठाच्या भौतिकीयेशास्त्र (फिजिकल सायन्सेस) प्रशाळेतील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली जात आहे. टप्प्या-टप्प्यात सर्व प्रशाळांमध्ये हा उपक्रम भविष्यात राबविला जाणार असल्याची माहिती कुलगुरुंनी दिली. लवकरच जैवशास्त्र प्रशाळेतही हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले. तसेच महाविद्यालयांमध्ये देखील याबाबत लवकरच चाचपणी केली जाणार आहे.
परीक्षेच्या अर्धातासआधी सेट होतील प्रश्नपत्रिकाउमविने आॅगस्ट महिन्यात प्रत्येक विषयाचे ७०० ते १ हजार प्रश्न असलेली प्रश्नपेढी तयार केली. नेट-सेट या परीक्षा व विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम डोळयासमोर ठेवून ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली. परीक्षा विभागाने यादृच्छिक (रॅन्डम) पध्दतीने संगणकाद्वारे प्रश्नपत्रिका तयार केली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांनी दिली. तसेच उमवितील काही प्रशाळांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका या परीक्षेच्या अर्धातास आधी सेट होणार आहेत. यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचा किंवा इतर प्रकार घडणार नाहीत.
विद्यार्थ्यांच्यासमोर सोडविल्या गेल्या समस्या
- सोमवारी याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भौतिकीयेशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रास एनर्जी स्टडीज या विषयाच्या २५ व मटेरियल सायन्स या विषयाला २७ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा २३ रोजी संपल्या.
- परीक्षा संपल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रशाळेतील शिक्षकांनी पूर्ण केली आहे. सोमवारी या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हातात या तपासलेल्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. एका सत्राचे चार पेपर आहेत. या चारही विषयांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे संबंधित विद्यार्थ्यांनी अवलोकन केले.
- तपासलेल्या उत्तरपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचे काही आक्षेप असतील तर त्याच सभागृहात उत्तरपत्रिका तपासलेल्या संबंधित शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी निरसन करुन घेतले.विद्यार्थ्यांना काहीही शंका नसल्याने लवकरच विद्यापीठाकडून या विषयांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.