जळगाव : कायद्याचा आदर करुन हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकोप्याने सण, उत्सव साजरे करावेत असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मंगलम सभागृहात मंगळवारी बकरी इदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. त्यात पालकमंत्री बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधिक्षक डॉ.निलाभ रोहम, जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, माजी उपमहापौर करीम सालार, जमील देशपांडे आदी उपस्थित होते.सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे, त्यामुळे पोलिसांना १२ तास ड्युटी करावी लागत आहे. मुस्लिम बांधवांनी कोरोनापासून संरक्षण करुन ईद साजरी करावी. हिंदू बांधवांनी देखील आगामी सण शांततेत साजरे करावेत दोन्ही समुदायांनी एकमेकांत मिसळून उत्सवाचा आनंद घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.कोरोनाच्या आपत्कालीन संकटामुळे जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला जाईल असे काम करु नये. सोशल मीडियाचा वापर जपून करा. खात्री केल्याशिवाय कोणताही संदेश प्रसारीत करु नका, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला बळी पडू नका, त्याचे अप्रिय प्रतिसाद समाजात उमटतात. सण, उत्सव साजरे करताना नियोजन करा, त्याला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी प्रास्ताविक तर अकबर पटेल यांनी सूत्रसंचालन केले.