ममुराबाद : परिसरातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन आठवड्यात सुमारे २४० जणांनी कोविड लसीकरण केले आहे. त्यात ६० वर्षावरील नागरिक, आरोग्य सेवक व सेविका तसेच फ्रंटलाईन वर्कर यांचा समावेश आहे.
धामणगाव आरोग्य केंद्रात सध्या कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रावर फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्ष वयावरील नागरिक तसेच ४५ वर्ष वयावरील कोमॉरबीड (मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त) नागरिकांना विनामुल्य कोविड लसीकरण केले जात आहे. व्याधीग्रस्तांना वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र अथवा नियमित उपचाराची फाईल सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड सोबत ठेवावे. सदरचे लसीकरण आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान असते. जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बारी यांनी केले आहे.