लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या आठ दिवसात तब्बल ३४१ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत कोरोना लस घेतली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांनी ही माहिती दिली. आठवड्यातील तीन दिवस लसीकरण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नशिराबाद गावाकरिता आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्वतंत्र सुविधा दिल्याबद्दल अनेकजण धन्यवाद देत आहेत. प्रत्येक लाभार्थ्याने दोन डोस घ्यायचे असून, पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाला लस मिळणार असून, घाई-गर्दी करु नये, नियमांचे पालन करावे, लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता, आपली लसीकरणाची वेळ असेल तेव्हा प्रत्येकाने कोरोनापासून सुरक्षा देणारे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.