मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील नवीपेठ भागातील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या घरावर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या घरात सद्य:स्थितीत कोणीही राहत नसून अशा परिस्थितीत महापालिकेने या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा बोर्ड लावल्याने मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
मनपा प्रशासनाकडून एखाद्या नागरिकाला कोरोनाची लक्षणे जाणवली, तर नागरिक ॲण्टिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करतात. या चाचणीत जर नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना कोविड सेंटर अथवा कोविड रुग्णालयात भरती केली जाते. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात, त्यांना गृहविलगीकरणातदेखील ठेवण्याची परवानगी महानगरपालिकेच्या विभागाकडून दिली जाते. त्यानंतर त्यांच्या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असा फलकदेखील लावला जातो. मात्र, नवी पेठेतील हे घर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला नाही, म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे घर डॉ. कैलास मुंगड यांचे असून या घरात कोणी राहत नाही. दरम्यान, याबाबत मनपा प्रभाग समिती अधिकाऱ्याला विचारले असता, अनेकदा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या घराचा पत्ता देतो, त्याच घरावर प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला जातो. कदाचित, संबंधित घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आली असून या व्यक्तीने जुना पत्ता दिला असल्याने या ठिकाणी हा बोर्ड लावला गेला असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.