ममुराबाद : गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधित क्षेत्रात अगदीच थातूरमातूर व्यवस्था करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये कोरोनाचे कोणतेच गांभीर्य आता राहिलेले नाही. सगळीकडे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्याबद्दल सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ममुराबाद येथे कोरोनाची लागण झालेल्या रहिवासी वस्त्यांना लगेच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याच्या बाबतीतही हयगय होताना दिसत आहे. फलक लावून रस्ता तात्पुरता बंद करण्याची काळजीसुद्धा ग्रामपंचायतीकडून घेतली जात नाही. याशिवाय बाधित सापडलेल्या भागात जंतुनाशकाची फवारणी करण्याकडेही कानाडोळा केला जात आहे. काहीएक खबरदारी प्रतिबंधित क्षेत्रात घेतली जात नसल्याने संबंधित ग्रामस्थांनी सर्व नियम अक्षरशः धाब्यावर बसविल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामपंचायतीकडून एकतर प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ते किंवा तेवढा भाग पत्रे वगैरे लावून पूर्णतः बंद केला जात नाही. बाधितांच्या घरावर सूचना फलक लावला म्हणजे आपले काम संपले, असे वाटून घेतलेल्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थही एकदम बेफिकीर झाले आहेत. किराणा, दूध व इतर सामान आणण्यासाठी कोणीही बाहेर जातो. धक्कादायक प्रकार म्हणजे कोरोनाबाधिताच्या संपर्कातील होम क्वारंटाइन केलेल्या नातेवाइकांचाही गावात सगळीकडे मुक्त संचार सुरू असतो. त्यांना फिरताना कोणीच हटकत नाही की काही दिवस घरात बसून राहण्याची ताकीद देत नाही. अशा प्रकारे सगळा सावळागोंधळ सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे.
--------------------------------
बंदोबस्तासाठी पोलिसांची वानवा
ममुराबाद गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्राची संख्याही वाढत चालली आहे. मात्र, सर्व ठिकाणची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याकडून एकाही पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी मनमानी पद्धतीने केव्हाही बाहेर ये-जा करताना दिसून येतात. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसते, अशी तक्रार आहे.