लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंसाठी मोठा आधार ठरत असलेल्या शिवभोजन केंद्रांची वेळ सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत वाढवून तेथे आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहे. या सोबतच शनिवार, रविवार केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान विविध व्यवहार बंद असल्याने राज्य सरकारच्यावतीने मजूर, स्थलांतरित, बेघर, आदींसाठी मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून वाटप होणाऱ्या ३ हजार ५०० थाळ्या कमी पडत असल्याने अनेक जण माघारी परतत जात होते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्राच्या थाळीचा इष्टांक दीडपट करण्यात आला व या ३८ शिवभोजन केंद्रांवरून ५ हजार १२५ थाळ्यांचे दररोज मोफत वितरण होत आहे.
कोरोना काळात गरजूंना हा आधार होत आहे. मात्र, कोरोनानंतर डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार शिवभोजन केंद्रांनाही बंधनांविषयी सूचना दिल्या आहेत.
या सूचनांनुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह शिवभोजन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार शिवभोजन केंद्रात बसून जेवण करता येईल; मात्र एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्केच उपस्थिती ठेवावी लागत आहे. या शिवाय शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सुविधा द्यावी लागणार असून, हे दोन दिवस केंद्रात बसून जेवण करता येणार नाही.
वेळ वाढविल्याने दिलासा
शिवभोजन केंद्रांचा वेळ पूर्वी दुपारी एक वाजेपर्यंतच होता. मात्र, आता निर्बंध लागू केले असले तरी यामध्ये वेळ वाढवून ती दुपारी चार वाजेपर्यंत केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळा
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिलासा असला तरी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढविली व जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यातून थेट तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांवरही गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले. त्यानुसार वरील बंधने राहण्यासह केंद्रांवर मास्क वापरणे आवश्यक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत केंद्रात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत.