लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ६ मार्च रोजी दिले आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये बंद राहण्यासोबतच शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. यात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीही कायम राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने २२ फेब्रुवारीपासून ते ६ मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर, आता त्यापेक्षाही अधिक झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने निर्बंध मागे न घेता ते १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठवडाबाजारही बंद राहणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगिचे बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने आणली असून मर्यादित उपस्थितीत केवळ निवेदन देता येणार आहे.