जळगाव : कोरोना चाचणीसाठी जिल्ह्यातील काही रुग्णालये, प्रयोगशाळा (लॅब) स्वॅब घेऊन या विषयी जिल्हा प्रशासनाला न कळविता परस्पर त्यांच्या स्तरावर खाजगी प्रयोगशाळेकडे पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तसे न करता रुग्णांचे नमुने कलेक्शन सेंटर, रुग्णालयात घेण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी दिले.रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी तीन खाजगी लॅबशी करार करण्यात आला आहे. यामध्ये काही लॅब व रुग्णालयात स्वॅब घेऊन ते परस्पर प्रयोगशाळेकडे पाठविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे नमुने घेतल्यानंतर संबंधितांना विलगीकरण अथवा अलगीकरण केले जात नाही. असेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा बसावा म्हणून स्वॅब घेताना निर्बंध घालण्यात आले आहे. या साठी काही अटी घालून देण्यात आल्या असून त्यानुसार खाजगी प्रयोगशाळांनी कलेक्शन सेंटर, क्लिनिक, रुग्णालयांमध्येच नमुने घ्यावे, यासाठी आयसीएमआरच्या नियमांचे पालन करावे, मान्यता प्राप्त प्रयोगशाळांकडेच नमुने पाठवावे, तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल दररोज जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवावा, अहवाल येईपर्यंत तहसीलदार अथवा इन्सिडेंट कमांडर यांना माहिती देऊन संबंधित व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे, ठरवून दिलेलेच दर आकारावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
रुग्णांचे स्वॅब घेण्याबाबत प्रयोगशाळांना निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:57 PM