जळगाव : कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने राज्य सरकारने आगामी पंधरा दिवस काही निर्बंध लागू केले आहे. मात्र, जळगावात अधिकचे रुग्ण समोर आल्याने आधिच कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, काही ठिकाणी हे निर्बंध असल्याने चांगले परिणाम समोर येतीलही, मात्र, बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दीचे करायचे काय हा प्रश्न मात्र, प्रशासनासमोर कायम आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सलग ९५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. गेल्या आठवडाभरात ६ हजारांपेक्षा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही अत्यंत चिंतेचेी बाब असून यात शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांपेक्षा अधिक समोर आले आहेत. त्यामुळे शहरात नुकताच तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
चित्रपटगृहे, हॉटेल्स
जिल्ह्यात चित्रपट गृहे बंदचे आदेश आहेत. तर हॉटेल्सला पन्नास टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वास्तवात हॉटेल्समध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.
विवाह समारंभ
लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजिनक मोक्ळ्या ठिकाणी, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत बंद, लग्न मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करून धरच्या घरी, शास्त्रोक्त, वैदिक पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत, नोंदणीकृत विवाहसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तिंना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अंत्यविधी
अंत्यविधीसाठी वीस लोकांच्या उपस्थितीची परवागनी आहे. कोविड बाधित आणि संशियत रुग्णांवर नेरी नाका स्मशानभूमित अंत्यसंस्कार होत असून यासाठी कडक निकष ठेवण्यात आलेले आहेत.
कार्यालये
जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. मात्र, जि. प. त. बाधितांची संख्या वाढल्याने दोन दिवसांपूर्वी अत्यंत कमी उपस्थिती होती. मात्र, सोमवारी संख्या वाढलेली होती. बांधकाम विभागात अधिक गर्दी झालेली होती.
गृह विलगीकरण
गेल्या काही महिन्यांपासून कंटेमेंट झोन ही संकल्पना केवळ कागदावरच होती. घरांनाही कसलाही फलक लावला जात नव्हता, मात्र, आता रुग्णसंख्या वाढायला लागल्याने व जिल्हाधिकारी यांनी सक्त सूचना दिल्याने आता गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरावर फलक लावला जात आहे.