लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला मार्केट कोरोनाचे निमंत्रण घर ठरू शकते. त्यामुळे मंगळवारपासून आता बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तर केवळ घाऊक विक्रेत्यांनाच टप्प्याटप्प्याने बाजार समितीत प्रवेश देण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज पहाटे ५ वाजेपासून शेतीमालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. सर्वात धोक्याची बाब म्हणजे, याठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सचिवांवर सोपविली जबाबदारी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गर्दी होवू नये म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी बाजार समितीच्या सचिवांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीतील बदल दिसून येतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक स्वरूपात कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.