जळगाव : सेवेत असताना शासनाने जिल्ह्यातील १४० पोलिसांच्या वेतनवाढीचे एक कोटीच्यावर रक्कम उपदानातून वसूल केली. ही रक्कम दहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही, शेवटी अवमान याचिका दाखल झाल्यावर राज्यातील १५९ याचिकाकर्त्यांचे ४३ लाख ३६ हजार ८०९ रुपये शासनाने अदा केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. इतक्यावर शासनाची सुटका होणार नाही. सध्या दिवाळीमुळे न्यायालयाला सुटी असल्याने कामकाज बंद आहे, मात्र न्यायालय सुरु झाल्यावर निवृत्त अधिकारी व कर्मचारी विरुध्द शासन असा लढा सुरुच राहणार आहे.
निवृत्त पोलीस कल्याण असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष धनंजय महांगडे (भापोसे), उपाध्यक्ष सोपानराव महांगडे, सचिव संपतराव जाधव, जळगाव संघटनेचे अध्यक्ष आर.के.वंजारी, शांतीदूत संघटनेचे अध्यक्ष एस.एन.माळी, उपाध्यक्ष सुभाष तोडकर, पंडीतराव भावसार, सुरेश पवार यांच्यासह ८६ जणांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुध्द अवमान याचिका दाखल केली होती. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात या याचिका दाखल झाल्याने सरकारने तातडीने १५९ जणांना ४३ लाख ३६ हजार ८०९ रुपये बँक खात्यात जमा केले. याकामी पुंडलिक माळी, फारुख शेख व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात हा लढा यशस्वी केला.