जळगाव : मजुरांना घेऊन मुंबईहून ओडिशाकडे निघालेल्या बसखाली चिरडून दुचाकीस्वार सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार नारायण देवराम पाटील (६५, रा़ सामनेर ता़ पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास खेडी गावाजवळील महामार्गावर घडली़ दरम्यान, या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेले गणेश भगवान साळुंके (रा़ सामनेर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे नारायण पाटील हे कुटूंबीयांसह वास्तव्यास होते़ दोन वर्षापूर्वीच ते ठाणे येथून सहाय्यक फौजदार म्हणून सेवानिवृत्त झाले़ काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची बुलेट ही दुचाकी नशिराबाद रस्त्यावर असलेल्या त्या दुचाकीच्या शोरूममध्ये दुरूस्तीसाठी दिली होती़ दरम्यान, ती दुचाकी दुरूस्त झाली की नाही, हे पाहण्यासाठी नारायण पाटील हे दुसऱ्या दुचाकीने (क्ऱ एमएच़१९़बीबी़७७७७) जळगावात आले होते़ त्यांच्यासोबत दुचाकीवर गावातीलच गणेश साळुंके हे ही होते़आणि़़़ धडक देत चिरडलेनशिराबाद रस्त्यावरील शोरूमध्ये असलेले काम आटोपून दोघेही दुचाकीने जळगाव शहराकडे जाण्यासाठी १०़३० वाजेच्या सुमारास निघाले़ शोरूमच्या काही अंतरावरच असताना मुंबईहून मजुरांना घेवून लक्झरी बस (क्ऱएमएच़०४़जी़८८०५) या ओडीशाकडे निघालेल्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ धडक देताच दुचाकी बसखाली अडकली आणि नारायण पाटील यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर दुचाकीच्या मागे बसलेले गणेश साळुंके यांना गंभीर दुखापत झाली़पोलिसांनी घेतली घटनास्थळी धावअपघाताच होताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता़ त्याचवेळी रावेर येथे तपासासाठी एलसीबीचे रवींद्र पाटील, संजय सपकाळे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी हे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली़ पोकॉ. विजय विजय नेरकर, इम्रान सैय्यद, मुकेश पाटील, सचिन चौधरी, भुषण सोनार यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील जमाव पांगवून बसमध्ये अडकलेली दुचाकी बाहेर काढली व जखमी गणेश साळुंके यांना त्वरित खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेले़
बसखाली चिरडून निवृत्त पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 9:49 PM