जळगाव : महापालिका प्रशासनाकडे ९ महिन्यांच्या थकीत निवृत्त वेतनासाठी अनेक दिवस लढा देवूनही हक्काच्या वेतनाच्या प्रतीक्षेत असलेले सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय चौधरी यांचे सोमवारी रात्री ११ वाजता निधन झाले. सोमवारी मनपासमोर सेवानिवृत्त शिक्षकांच्या झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यांच्या आजारपणावर उपचारासाठी पैशांची गरज असतानाही मनपाने शेवटपर्यंत वेतन न दिल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.अनेक महिन्यांपासून दत्तात्रय चौधरी हे आजारपणामुळे अंथरुणावर खिळून होते. निवृत्ती वेतनाअभावी त्यांना वेळेवर औषधोपचार करता आले नाही. सेवानिवृत्त शिक्षक संघटनांकडून अनेकदा आंदोलन करून देखील मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक शिक्षक हक्काच्या वेतनाच्या प्रतीक्षेत असून भविष्यात कोणत्याही शिक्षकाचा मृत्यू झाल्यास त्याला महापौर, आयुक्त व आमदार जबाबदार राहतील असे जळगाव शहर महापालिका सेवानिवृत्त शिक्षक संघाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेतील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:53 AM