लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण पुन्हा एकदा कोरोनामुळे रखडले आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात कुणालाही बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने काम बंद होते तर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये लेबर कॅम्पमधील मजूरच आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या कामाला खीळ बसली आहे. मार्च महिन्यात ठेकेदाराकडे १०० मजूर आणि ६० कर्मचारी होते. आता फक्त १६ मजूर आणि ७ कर्मचारी राहिले आहेत.
शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च आणि एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला चांगलेच वेगात सुरू होते. मात्र, एप्रिल महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहदारी कमी झाली असून, कामाचा वेगदेखील वाढला. यात महामार्गाला जोडणारे सुमारे २० लहान जंक्शन पूर्ण करण्यात आले. कालंका माता मंदिर आणि इच्छादेवी मंदिर येथे पाईप कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सालार नगरातील पूल आणि विद्युत कॉलनीतील लहान पूल यांचे कामदेखील सुरू झाले. सारे काही सुरळीत असतानाच या मार्गाच्या ठेकेदाराच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर हळुहळू करत कर्मचारी आणि मजूर आपापल्या गावी परत जायला लागले. होळीसाठी गेलेले मजूर यावेळीदेखील लॉकडाऊनच्या भीतीने परतलेच नाहीत. जे होते त्या मजुरांना हाताशी धरुन ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनी काम रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकजण भीतीपोटी किंवा कौटुंबिक कारणे सांगून गावी परत जायला लागले आहेत. आता तेथे मोजकेच कर्मचारी शिल्लक आहेत. त्यामुळे काम दहा दिवस आधी ज्या स्थितीत होते, त्यात आता फारशी सुधारणा झालेली नाही.
अग्रवाल चौकातील कामालाही सुरूवात झालेली नाही. अग्रवाल चौकात भुयारी मार्ग करण्यासाठीच्या कामाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा यांनी एप्रिल महिन्यातच केली होती. मात्र, अद्यापही या चौकात भुयारी मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही.
फर्दापूर ते कुसुंबा रस्त्याचे काम सुरळीत
फर्दापूर ते कुसुंबा या रस्त्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे. जळगाव ते औरंगाबादला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू होते. हे काम सध्या ९० टक्केच्या जवळपास पूर्ण झाले आहे. गाडेगावच्या घाटातील सहाशे मीटरचे काम भूसंपादनाअभावी राहिले आहे. तर वाकोद, पहूर आणि नेरी येथील मोठ्या पुलांचे कामदेखील अपूर्ण आहे. याठिकाणी लागणारे सर्व मजूर हे लेबर कॅम्पमध्ये राहात आहेत.
ठेकेदाराने नव्या मजुरांची व्यवस्था करावी
ठेकेदाराकडील मजूर व कर्मचारी गावी परतल्यामुळे जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असताना ठेकेदाराने कामाची गती वाढविण्यासाठी नव्या मजुरांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी जळगाव शहरालगत असलेल्या कुसुंबा, नशिराबाद, भादली, शिरसोली, पाळधी, आव्हाणे, ममुराबाद या गावातील मजुरांचा शोध घेणे गरजेचे आहे.
महामार्गाच्या कामाला अजून किती विलंब होणार
जळगाव शहरांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही काम पूर्ण झालेेले नाही. या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कामासाठी वेळेची मर्यादा निश्चित करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
खोटे नगर ते कालंका माता मंदिर महामार्ग
अंतर ७ किलोमीटर
किंमत ६१ कोटी
एप्रिलमध्ये मजुरांची संख्या १००
मेमध्ये मजुरांची संख्या १६