जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाने रुसवा धरल्याने पिकांची स्थिती नाजूक बनली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे. चिंतेचे सावट दूर झाले असून नदी- नाले प्रवाहीत झाले आहेत. येत्या शनिवारपासून जिल्ह्यात कानबाईचा उत्सव सुरू होणार असून पावसाच्या पुनरागमनाने आता खऱ्या अर्थाने उत्साहाला उधाण येणार आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली असून पिकांना जीवदान मिळाले आहे.भुसावळला दमदार पाऊसभुसावळ शहर व परिसरात गुरुवारी सकाळी सहापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पाहिजे तसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. तसेच पाण्याचीही समस्या निर्माण झाली होती. आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली व दिवसभर पाऊस सुरूच होता . यामुळे या पावसाळ्यात १६ रोजी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.शेतकरी आनंदितगत महिन्यात पावसामुळे पिकांची वाढ योग्य पद्धतीने होत असताना पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. तसेच अनेक रोगराईंचा सामना पिकांना करावा लागत होता. सकाळपासूनच जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी राजा आनंदित झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, न्हावी परीसरात रात्री ९ वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.
तीन आठवड्यानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:23 AM
गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह जनमानस सुखावले आहे.
ठळक मुद्देपावसाअभावी वाढ खुंटलेल्या पिकांना जीवदाननद्या -नाल्यांना पूर आल्याने झाले प्रवाहित