डमी १२१४
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खाद्यतेलाचा पदार्थ बनविण्यासाठी पुन्हा पुन्हा वापर करणे आणि अशा तेलाच्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास शरीराला मोठी हानी होऊ शकते, यात कर्करोगासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय हॉटेलमध्ये ५० लिटरच्या रोज वापर असताना अशा तेलाचा वापर करणे हा गुन्हा ठरतो, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खाद्यतेलाच्या अतिरिक्त सेवनाने शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. यात कोलेस्ट्रॉल वाढणे, मधुमेह, रक्तदाब तसेच पोटाचे विकार उद्भवतात. मात्र, जर तुम्ही वारंवार वापरलेल्या तेलाच्या पदार्थांचे जास्त सेवन करीत असल्यास तुम्हाला कर्करोगाचाही धोका असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासह घरीही तेलगट पदार्थ कमीच खावे असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोलेस्ट्रॉल वाढते
तेलाच्या अतिरिक्त सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे विकार जडू शकतात. त्यामुळे शक्यतोवर वारंवार बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तुम्ही सतत बाहेरचे खात असाल तर धोका उद्भवू शकतो. - डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, मेडिसीन
कर्करोगाचा धोका
पुन्हा पुन्हा वापरात येणाऱ्या तेलाच्या पदार्थांमुळे तुम्हाला पोटाचे व तातडीने दिसणारे विकार होतात. शिवाय वारंवार अशा पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला अन्ननलिकेचा कर्करोग, पोटात ट्युमर होऊ शकतो. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे, घरी ताजे बनवून खाणे योग्य त्यातही तेलाचा वापर कमी करावा. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख, मेडिसीन
आरोग्याला घातक
एकदा तेलाचा वापर हा योग्य मात्र, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्यास यातून तुम्हाला पोटाचे विकार उद्भवू शकतात. यात अपचन, पोट फुगल्यासारखे वाटणे, मळमळ, असे ताबडतोब दिसणारे परिणाम समोर येतात. तेलाच्या अतिरिक्त वापर हा शरीराला हानीकारक असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बाहेरचे पदार्थ वारंवार खाणे टाळा
- अन्न हे नेहमी ताजे व स्वच्छ असावे, अन्यथा यातून पोटात विविध विषाणू, जीवानुंचा तुमच्या शरीरात प्रवेश होऊ शकतो.
- शिळे व उघड्यावरचे खाल्ल्याने विविध विकार उद्भवू शकतात. याचा परिणाम थेट तुमच्या प्रतिकारक्षमतेवर होऊ शकतो.
- बाहेरचे पदार्थ वारंवार खाणे हे आरोग्याला धोकादायक असते. यातून विकार उद्भवू शकतात. त्यामुळे रस्त्यावरचे न खाल्लेलेच बरे असे डॉक्टर सांगतात.
कोट
दिवसाला ५० लिटरपेक्षा जास्त तेलाचा ज्यांचा वापर आहे. त्यांच्या बाबतीत हा गुन्हा ठरतो. आम्ही सहा ठिकाणी अशा तपासण्या केल्या असून जिल्हाभरात या तपासण्या सुरू आहेत. - योगेश बेंडकुळे, उपायुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग