१९ हजार ५५ मिळकतींची वाढ : मालमत्ता कराचे उत्पन्न होणार दुप्पट, लवकरच होणार सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगरपालिका हद्दीत मिळकतीची फेरमूल्यांकन आकारणी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरात मनपाच्या दप्तरी ९६ हजार ९४५ मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता १ लाख १६ हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे दुपटीने उत्पन्न वाढणार आहे. यामुळे मनपाची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारणार आहे.
मनपा हद्दीतील मिळकतींवर मालमत्ता कर लावण्यासाठी आकारणी केली जाते. मनपा प्रशासनानेदेखील ज्यावेळी आकारणी केली त्यावेळी आकारणी करताना तळमजला १०० टक्के, पहिला मजला ७५ टक्के तर दुसऱ्या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास ५० टक्के यानुसार आकारणी केली जात होती. दरम्यान, केंद्रीय लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर आक्षेप नोंदविण्यात आले होते. १९९७ ते २०१७ पर्यंत करण्यात आलेली मालमत्ता कराची आकारणी चुकीची केल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर फेरमूल्यांकनाचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला होता.
सर्वेक्षणात १९ हजार ५५ मिळकतींची वाढ
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकन करण्यासाठी मनपाने २०१७ ला अमरावती येथील स्थापत्य एजन्सीला मक्ता दिला. त्यानुसार एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना क्रमांक दिले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप केले. घराचे फोटो काढून नकाशे तयार केले. तसेच ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा हद्दीत आधी ९६ हजार ९४५ मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता १ लाख १६ हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून तब्बल १९ हजार ५५ मिळकतींची वाढ झाली आहे. मालमत्ता करातून मनपाला २८ कोटींचे उत्पन्न मिळायचे. मात्र, आता जवळपास ६० ते ६५ कोटींचे उत्पन्न मनपाला मिळणार आहे.
अशी होणार आकारणी
मनपा हद्दीतील मिळकतींची आकारणी करताना तळमजला १०० टक्के, पहिला मजला ७५ टक्के तर दुसऱ्या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास ५० टक्के यानुसार आकारणी केली जात होती. मात्र, आता फेरमूल्यांकनात तळमजला, पहिला मजला १०० टक्के, दुसरा मजला ९५ टक्के तर तिसऱ्या मजल्यापासून ९० टक्केप्रमाणे आकारणी केली जात आहे. तसेच बहुमजली इमारतीत एक ते चौथ्या मजल्यापर्यंत १०० टक्के आकारणी तर पाचव्या मजल्यापासून ५ टक्क्याने वाढ करत १०५ टक्क्यांनी आकारणी करण्यात आली असून लवकरच सुनावणी होणार आहे.
कोट..
शहरातील नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन, आता लवकरच याबाबत नोटिसा देण्याचे काम सुरू करण्यात येईल. गेल्या काही वर्षांपासून हे काम सुरू होते. सुनावणी प्रक्रिया घेऊन पुढील मिळकती निश्चित करण्यात येतील.
-प्रशांत पाटील, उपायुक्त महापालिका