जळगाव : शेतक-यांच्या प्रश्नांवर भांडताना आपण शेतकºयांचेच, सामान्य माणसाचे नुकसान करतोय, याचा विचार राजू शेट्टी यांना करायला हवा. त्यांचे आंदोलनाचे तंत्र देशविरोधी असून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकºयांना वेठीस धरण्याचे उद्योग त्यांनी थांबवावेत, अशी जोरदार टीका वजा सूूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कायदा हातात घेण्याची भाषा शासन खपवून घेणार नाही, असा ईशाराही त्यांनी शेट्टी यांना दिला.
युतीचा निर्णय गिरीश महाजन, खडसेंनी घ्यावामनपा निवडणुकीत शिवसेनेशी अथवा खाविआशी युती करण्याच्या विषयाबाबत विचारले असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात. तसेच वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय व्हायला हवा. मी पालकमंत्री असलो तरीही अंतराच्या दृष्टीने वेळेच्या मर्यादा आहेत. शासकीय कामे मी गतीने मार्गी लावतो. मात्र संघटनात्मक कामांना मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ग्राऊंड फील काय येतो? युतीने फायदा होईल की तोटा? याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक निर्णय १०० टक्के बरोबरच असतो, असे नाही. त्यामुळे काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही.