कुंदन पाटील
जळगाव : पाचोरा ,भडगाव ,एरंडोल तालुक्यातील सिमेवर असणाऱ्या उत्राणमधील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर महसुल विभागातील शुक्राचार्यांचे आरोपींशी असलेल्या संबंधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर या शुक्राचार्यांवर कारवाईचे सुतोवाच प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, महसुल अधिकाऱ्यांच्या संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी सामुहिकपणे चर्चा केली आणि याप्रकरणातील आरोपींवर गंभीर स्वरुपाची कारवाई व्हावी, म्हणून मागणी केली. अन्यथा ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये परधाडे (पाचेारा) येथील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच रात्रीतून २० ते २५ ट्रॅक्टरद्वारे उपसा केलेली वाळू वाहून नेण्यासाठी शेतातून वाट करुन देणाऱ्या भातखंडे येथील एकाचे नाव पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाचोरा प्रांताधिकाऱ्यांना तातडीने माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच वाळूमाफियांशी साटेलोटे असल्याचा संशय असणाऱ्या परधाडे येथील तलाठी, कोतवालसह अन्य कर्मचाऱ्यांविषयीदेखिल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
‘त्या’ आमदाराविषयी नाराजी
हल्लेखोर वाळूमाफियांना एका आमदाराने पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.त्यासाठी पोलीस व महसुल प्रशासनावर दबावही टाकला जात आहे. हल्लेखोर आरोपी आमदारांचे पंटर असल्याने महसुली ‘आप्पा’ मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. या आमदाराचा चेहरा उघड करावा, अशी मागणीही काहींनी केली आहे.
हल्लेखोर आरोपींना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्याविरोधात मोक्का, एमपीडीएननुसार कारवाई करावी, अन्यथा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने ‘काम बंद’ आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना देण्यात आले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सुचिता चव्हाण, विजय बनसोडे, सुनिल समदाणे, पी.बी.झांबरे, राजेंद्र पाटोळे, देवेंद्र भालेराव, भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.