कुंदन पाटील
जळगाव : अनुकंपधारकांच्या रिक्त ३९ जागांपैकी ३२ जणांच्या कागदपत्रांची तपासणी आटोपली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच २८ जणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी निर्माण करुन दिल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपधारकांना सेवेत दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यानुसार ३२ जणांचे प्रस्ताव सादर झाले. चार दिवसांपूर्वी या पात्र उमेदवारांच्या प्रस्तावासह कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली. तसा अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोनच दिवसात नियुक्तीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार पंकज लोखंडे यांनी सहकाऱ्यांकरवी ही प्रक्रिया पूर्ण केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी २८ पात्र उमेदवारांना बोलावून अल्पबचत भवनात सामुहिकपणे त्यांना नियुक्तीपत्र वाटप केले. त्यातील २१ जणांना तलाठी संवर्गात तर ७ जणांना लिपीक संवर्गात संधी देण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया तत्काळ राबविणाऱ्या तहसीलदार लोखंडे, अव्वल कारकून योगेश पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता वाघ, गणेश हटकर, रियाज पटेल यांचेही कौतुक केले.