जळगाव : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे जिल्ह्यात झालेल्या बाधीत क्षेत्रामध्ये एरंडोल तालुक्यातील वाढीव क्षेत्राची भर पडल्याने हे क्षेत्र ७ लाख ४ हजार ८४३ हेक्टरवर पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांचा मदतीचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन) सादर करण्यात आला.जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन त्यात कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर पंचनाम्याचे आदेश दिल्यावरही दिवाळीच्या सुट्यांमध्ये पंचनाम्याचे काम रखडले होते. अखेर पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल सचिवांकडे सादर करण्यात आला होता. त्यात जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे नमूद करीत तसा प्रस्ताव मदत व पुनर्वसनविभागाकडे सादर केला होता. मात्र एरंडोल तालुक्याचे वाधीत क्षेत्रात वाढ झाल्याने प्रशासनाच्यावतीने सुधारीत अहवाल सादर करण्यात आला.एक हजार ३६ हेक्टर क्षेत्र वाढलेजिल्ह्यात जिल्ह्यात सहा लाख ३४ हजार ३६८ शेतकऱ्यांचे ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र एरंडोल तालुक्यात एक हजार ३६ हेक्टर एवढे वाधीत क्षेत्र वाढले. त्यामुळे हे क्षेत्र वाढून सहा लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे ७ लाख ४ हजार ८४३ हेक्टरवर पोहचले आहे.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना हा सुधारीत अहवाल सादर केला आहे. अतिवृष्टीत पिकांच्या व फळपिकांच्या नुकसानीचे प्रपत्र अ, ब, क, ड अन्वये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवालात म्हटले आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. कापसाला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने कपाशीचे बोंड अक्षरश: सडून गेली तर ज्वारी काळी पडली. तसेच मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिपावसामुळे त्यावर बुरशी आली. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला आहे. सोबतच इतर पिके, चारा अतिवृष्टीने खराब झाली आहेत. त्यामुळे आता अहवाल सादर झाल्याने शेतकºयांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी ६४३ कोटींचा सुधारीत प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:58 PM