कृषि संजीवनी मोहीम
जळगाव : जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावात शेतकऱ्यांनी कृषिविषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार असून या कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ११ जून रोजी संध्याकाळी वाजता चोपडा येथे शिवसेना मेळावा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १०.३० वाजता जळगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते भेट देणार आहे.
गृहरक्षक दलाचा गौरव
जळगाव : गृहरक्षक दलाची माहिती देणाऱ्या कर्तव्य या लघुपटाच्या निर्मितीबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक सचिन आनंदा कापडे यांचा गौरव करण्यात आला. पोलीस दलासोबत कर्तव्य बजावणाऱ्या गृहरक्षक दलाचे कार्य कर्तव्य लघुपटाद्वारे जनतेपर्यंत पोहचणार असल्याचा उल्लेख करीत कापडे यांना गौरव पत्र देण्यात आले.
‘त्या’ कर्मचा-यावर कारवाईची मागणी
जळगाव : धुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने देवतांच्या फोटोचा अपमान केल्याने त्याच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य निर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. असे असताना हिंदू धर्माच्या देवतांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करून शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.