पाचोरा : जाचक शुल्कवाढीविरुद्ध पाचोरा येथे रिक्षाचालकांनी कडकडीत बंद पाळला. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. शहर जणू ठप्प झाले होते.राज्य परिवहन विभागाने वाहतूकदारांवर अन्यायकारक वाढीव शुल्क व दंड आकारणी सुरू केली आहे. ती रद्द करावी तसेच रिक्षा पासिंग तालुकास्तरावर कॅम्पच्या दिवशीच व्हावी या मागण्या पाचोरा एकता ऑटो रिक्षाचालक - मालक युनियनने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना हे निवेदन मोर्चाद्वारे तहसील कचेरीत जाऊन दिले असून निवेदनाद्वारे कळविल्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण भागात ऑटो रिक्षा चालवून परिवाराची उपजीविका भागवतो. रिक्षाचालकास नियमित रिक्षा पासिंगसाठी त्या दिवसाचा व्यवसाय बंदच ठेवून जळगाव येथे जावे लागते. यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. परिवहन विभागातर्फे उशिराने गाडी पासिंग करणा:यांना दिवसागणिक 50 चा दंड आकारणीचा नियम लागू करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने वाढवलेल्या 15 पट आकारणी शुल्कामुळे रिक्षा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. आकारलेला शुल्क व रोजचा रु.50 चा दंड रद्द करण्यात यावा, तसेच तालुकास्तरावरील कॅम्पमध्येच रिक्षा पासिंग करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांचा विचार न झाल्यास पुढे बेमुदत रिक्षा बंद आंदोलन केले जाईल व आरटीओ विभागाला तालुका प्रवेश बंदी केली जाईल, असा इशाराच एकता ऑटो रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे. निवेदनावर एकता ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ संदानशिव, उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिव अनिल लोंढे, सुधाकर महाजन, नाना चौधरी, अशोक निंबाळकर, गणेश पाटील आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)पाचोरा शहरात सुमारे 250 ऑटो रिक्षा असून शहरात रिक्षाची संख्या वाढल्याने साहजिकच आता व्यवसायिक स्पर्धा वाढली आहे. यामुळे आता दररोज 100 ते 150 रु व्यवसायसुद्धा होत नाही. त्यात परिवहन विभागाचे नवीन नियम रिक्षाचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. हा व्यवसाय आता अगदीच न परवडणारा ठरणार आहे.रिक्षा पासिंग करताना दिवसागणिक 50 रुपये दंड आकारणी रद्द करावी तसेच रिक्षा पासिंग तालुकास्तरावर कॅम्पच्या दिवशीच व्हावी या मागणीसाठी पाचोरा एकता ऑटो रिक्षाचालक - मालक युनियनने एक दिवस ऑटो रिक्षा बंद ठेवून या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तालुकास्तरावरील कॅम्पमध्येच रिक्षा पासिंग करण्यात यावी, या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने पाचोरा येथील रिक्षा बेमुदत बंद आंदोलन करून आरटीओ विभागाला तालुका प्रवेशबंदी करू.-एकनाथ हरी संदानशिव,एकता ऑटो रिक्षा युनियन पाचोरा अध्यक्ष
रिक्षा बंदमुळे पाचोरा झाले ठप्प
By admin | Published: February 03, 2017 12:53 AM