जळगाव : अजिंठा चौकात नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या सचिन बाळू न्हायदे (३०, रा. कासमवाडी) या तरुणाला मारहाण करून चौघांनी त्यांची मालवाहू रिक्षा लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. न्हायदे गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजता यावल येथे जायला निघालो असता अजिंठा चौकात काहीवेळ नाश्त्यासाठी थांबलो. त्यावेळी कालंकामाता चौकाकडून चार तरुण पायी चालत आले. काहीएक कारण नसताना त्यांनी रिक्षातून ओढून मारहाण केली व बाहेर फेकून देत ती रिक्षा भुसावळच्या दिशेने पळवून नेली. या घटनेनंतर आरडाओरड करून या तरुणांचा पाठलाग केला. मात्र, ते हाती लागले नाहीत. सलग चार दिवस रिक्षा व संशयितांचा शोध घेऊन त्याचा तपास न लागल्याने सचिन न्हायदे हा तरुण गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याची हकिकत ऐकून घेत एक पथक संशयितांच्या शोधार्थ निघाले.