मुंबई/जळगाव - मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाच्या शुभारंभाचा कार्यक्रम पाडला. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील खेडी येथे उभारण्यात येणार असलेल्या भव्य 'वारकरी भवना'चे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. उत्तरम महाराष्ट्रातील हे पहिलेच एवढे मोठे वारकरी भवन असून पंढरीच्या वारीसाठी विठु-माऊलीच्या दर्शनाची आस घेऊन वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या भवनच्या माध्यमातून हक्काचं निवासस्थान उपलब्ध होत आहे.
जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा असून तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, त्यातील किर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मंरण करुन समाज प्रबोधनाचे काम करत आहे. उत्तर महाराष्ट्रात ५५ एकरावर हे पहिलेच 'वारकरी भवन' उभारले जात असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६ कोटी ६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे वारकरी भवन पूर्ण होईपर्यंत त्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. पंढरपुरचा विकास होत असतांना राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतुद केल्याची माहितीही यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला मोठी गर्दी होत असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्तजण पंढरपुरात दाखल होतात. लाखोंच्या संख्येने हे वारकरी पायी वारी करत इथे पोहोचतात. वाटेत अनेक ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. तर, अनेक मानाच्या पालख्या घेऊनही वारकरी संस्था पंढरीकडे येत असतात. जळगावमधून संत मुक्ताबाईंची पालखी हजारो वारकरी भक्तांच्या सोबतीने पंढरीत येत असते. आता, याच जळगाव जिल्ह्यातील खेडमध्ये उभारण्यात येत असलेले हे वारकरी भवन भक्तांसाठी उत्तम सोय म्हणून सेवेत दाखल होईल.