ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे 18 रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावकर हळहळले. 12 वर्षापूर्वी लोकमत सखी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सखींना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला होता. त्यांच्या या आठवणींनी सखी हळहळल्या. आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना भुरळ घालणा:या रिमा लागू यांच्या निधनाने जळगावकरांना धक्का बसला. रिमा लागू सखींना म्हणाल्या होत्या की, ‘महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे. या ताकदीचा आपण वापर केला पाहिजे. नुसत्या रडत बसू नका. आपल्यात जी क्षमता आहे, जी पुरु षात आहे. तेव्हा परिस्थितीला आणि इतरांना दोष देऊ नका. कुणाकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वत:च्या पंखांना स्वत:च बळ द्यायला हवे आणि खंबिरपणे उभे राहायला हवे.’ त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाला सखींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली होती. त्यांच्या या प्रेरणेने आज अनेक सखी स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आज रिमा लागू यांच्या निधनाचे वृत्त समजताच सखींना धक्का बसला. त्यांनी दिलेला कानमंत्र आठवला आणि हळहळ व्यक्त केली. ‘लोकमत’ सखी मंचच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळतं, याचा रिमा लागू यांना खूप आनंदही झाला होता. विशेष म्हणजे रिमा लागू यांनी त्यावेळी जळगावचे प्रसिद्ध भरीत, भाकरी, ठेचा आणि शेवभाजीचाही आस्वाद घेतला होता. ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे जळगावातील गृहिणी विशाखा देशमुख यांनी सांगितले. रंगभूमीवर त्यांचा सहज वावर होता. अनेक आव्हानात्मक भूमिका त्यांनी साकारल्या. आईची भूमिका तर सवरेत्कृष्ट होती. 12 वर्षापूर्वी त्या लोकमत सखी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सखींशी साधलेला संवाद आजही स्मरणात असल्याचे विशाखा देशमुख म्हणाल्या.
रिमा लागू यांनी जळगावात सखींना दिला होता यशाचा कानमंत्र
By admin | Published: May 18, 2017 6:13 PM