विजयकुमार सैतवालजळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बहुमत मिळवित सरकार स्थापनेकडे वाटचाल करीत असल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम म्हणून भारतीय रुपयाही मजबूत झाला असून सोन्या-चांदीच्या भावात घसरण होऊन ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एकूणच ३३ हजाराकडे वाटचाल करणाऱ्या सोन्याच्या भावास रुपयातील सुधारणेमुळे ब्रेक लागला व आणखी स्वस्ताई येण्याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत.लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागल्याने त्याच दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली. त्यानंतर तर निकालाच्या दिवशी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र दिसू लागताच शेअर मार्केटने उसळी घेतल्याने व भारतीय रुपयाही वधारल्याने सोने-चांदीच्या भावात आणखी घसरण झाली. निवडणुकीचे निकाल येऊ लागताच सोने प्रती तोळा १०० रुपये तर चांदी ५०० रुपये प्रती किलोने घसरून सोने ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा तर चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली आहे. तसे पाहता नेहमी आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यात आता देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचाही यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. २३ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागताच विदेशी गुंतवणुकीचा कल मुंबई शेअर बाजाराकडे वळला व विदेशी गंगाजळी वाढल्याने शेअर बाजाराने उसळी घेतली. यामुळे विदेशात सोने-चांदीचे भाव कमी झाले. या सोबतच भारतीय रुपयातही सुधारणा होऊन हे भाव कमी होण्यास मदत मिळाली. लोकसभेचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी २३ रोजी सकाळी ६९.६४ रुपये असलेले अमेरिकन डॉलरचे भाव २४ रोजी ६९.५२ रुपयांवर तर २५ रोजी ते ६९.३८ रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव कमी होऊन ३२ हजार ३०० रुपयांवरून ३२ हजार २०० रुपयांवर आले. या सोबतच चांदीतही एकाच दिवसात ५०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली. नऊ दिवसांपूर्वी १५ मे रोजी भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले होते. ३३ हजाराच्या उंबरठ्यावर सोने असताना ऐन लग्नसराईत एक्झिट पोलच्या अंदाजाने सोने पुन्हा गडगडले व त्या वेळी सोन्याचे भाव ३२ हजार ३०० रुपयांवर आले होते. आता निकालानंतर पुन्हा घसरण होऊन हे भाव ३२ हजार २०० रुपयांवर आले आहे. शनिवारीदेखील हेच भाव कायम होते. भारतीय शेअर बाजारात विदेशी गंगाजळी वाढल्याने विदेशात सोन्याचे भाव घसरले व दुसरीकडे भारतीय रुपया सुधारत या दुहेरी परिणामामुळे सोने घसरले. यापुढेही बाजारात अशीच सकारात्मकता राहून भारतीय रुपयात सुधारणा व्हावी व सोने-चांदीचे भाव आणखी कमी व्हावे, अशी अपेक्षा ग्राहक वर्गातून व्यक्त होत आहे.
सराफ बाजाराच्या उंचावल्या आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 7:58 PM