लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मे महिन्यात जिल्ह्यात मोफत धान्य मिळणार आहे. मात्र त्यासाठी रेशनकार्डधारकाला ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. यात आता दुकानदारदेखील अडचणीत येणार आहे. या आधी जिल्ह्यातील काही दुकानदार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे त्यांनीही ई-पॉस मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक असू नये, अशी मागणी केली आहे. यासह आणखी काही मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदार संपावर जाणार आहेत.
राज्य सरकारने मोफत म्हणून जाहीर केलेले धान्य आता एप्रिलऐवजी मे महिन्यात दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू घटकांची गर्दी नक्कीच होईल. हे धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतील. त्या गर्दीत कोरोना आणखी पसरण्याचा धोका आहे. तसेच हे धान्य घेण्यासाठी नागरिकांना ई-पॉस मशीनवर आपला अंगठा द्यावा लागणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पसरू शकतो. त्यात प्रत्येक रेशन दुकानदाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर प्रत्येक दुकानदारासाठी उपलब्ध करून देणे शक्य होईल का? असा प्रश्नदेखील उपस्थित राहत आहेत.
एकूण रेशन कार्डधारक - १०,०६,६१३
पीएचएच - ४,७०,७९५०
अंत्योदय- १,३७,७४९
केशरी- ३,२३,०११
रेशन दुकानदारांची संख्या
२०५ तालुका आणि शहर
१९६८ जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानदार
रेशन दुकानांवर सॅनिटायजर राहणार का?
एका दुकानदाराकडे जवळपास दीड ते दोन हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी दुकानावर सॅनिटायजर ठेवणे दुकानदाराला परवडणारे नाही. शासन रेशनदुकानदारांना सॅनिटायजर किंवा मास्क देत नाही. या दुकानदारांचे अद्याप लसीकरणदेखील करण्यात आलेले नाही.
या आहेत रेशनदुकानदारांच्या मागण्या
राज्यात आतापर्यंत १२३ रेशन दुकानदारांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत द्यावी. स्वस्त धान्य दुकानदारांचा ५० लाखांचा विमा सुरक्षा कवच द्यावा, लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकची सक्ती करु नये. स्वस्त धान्य दुकानदार यांचे आधार प्रमाणित करून धान्य वाटपाची मुभा द्यावी, वाधवा समितीच्या अहवालाप्रमाणे मानधन द्यावे, दुकानदारांना महसूल चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशा मागण्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉप कीपर्स फेडरेशनने केल्या आहेत.