खासगी रुग्णालयात काही केसेस : दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित बालकांची संख्या अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही बालकांना एमएसआयसी म्हणजेच मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराचा धोका असून अशा काही केसेस खासगी रुग्णालयात आल्याचेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. शासकीय यंत्रणेत अशा लक्षणांचे बालक मात्र, अद्याप समोर आलेले नाही. मात्र, आगामी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने याबाबतही पालकांना जागृत राहावे लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जिल्हाभरात पहिल्या लाटेच्या तुलेनत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले होते. एकत्रित राज्यभराची परिस्थिती बघता बालकांचे मृत्यूही दुसऱ्या लाटेत वाढले होते. शिवाय काही वेगळी लक्षणेही या कालावधीत बालकांमध्ये समोर आली होती. यात बालके गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले होते. अनेकांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरही लावावे लागले होते. आता कोरोनातून बरे झालेल्या बालकांना एमएसआयसी या आजाराचा धोका उद्भवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ९ हजार मुलांना कोरोना
जिल्हाभरात ० ते १५ वर्षे वयोगटातील ८ हजार ७३० मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा सर्वाधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या लाटेत ही संख्या कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेत बालके गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले होते.
कोरोनाचे एकूण रुग्ण : १४२०७२
बरे झालेले रुग्ण : १३८४१२
उपचार घेत असलेले रुग्ण : १०९१
कोरोनाचे मृत्यू : २५६९
ही घ्या काळजी
१ मास्कशिवाय मुलांना बाहेर पाठवू नका, त्यांना गर्दीत नेणे टाळा.
२ बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी आपण स्वत: सुरक्षित राहिल्यास मुले सुरक्षित राहतील, हे लक्षात ठेवून काळजी घ्यावी.
३ मुलांना काही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, परस्पर औषधोपचार करू नका.
४ बालकांना दैनंदिन योग्य, पौष्टिक आहार द्या.