अमित महाबळ, जळगाव : तुम्ही मधुमेही असाल आणि तुमची रक्तातील साखर जर नियंत्रणात नसेल तर डोळ्यांची न चुकता काळजी घ्या. कारण, अशा व्यक्तींना ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’मुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. हा आजार प्राथमिक टप्प्यात लक्षात येत नाही, त्यामुळे या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची दृष्टी वाचविण्याची मोठी मोहीम महाराष्ट्रात नेत्ररोगतज्ज्ञ सोसायटीने हाती घेतली आहे.
भारतात मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वात वाढ होत आहे. मधुमेहामुळे चष्म्याचा नंबर बदलणे, मोतिबिंदू लवकर होणे, वारंवार रांजणवाडी येणे, डोळ्यांच्या स्नायूचा पॅरालिसीस होऊन तिरळेपणा येणे आदी समस्या येतात. जीवनशैलीमुळे मधुमेह कोणत्या वयोगटात होईल हे ठरविता येणे कठीण झाले आहे. अगदी लहान मुलांनाही मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत. दिवसेंदिवस मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात मधुमेहाच्या एकूण रुग्णांमध्ये ३० ते ४० टक्के रुग्ण हे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’चे असतात. पण हा आजार प्राथमिक टप्प्यात लक्षात येत नाही. जेव्हा कळतो तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी जाऊ शकते किंवा कायमचे अंधत्व येते. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी रक्तातील साखर २०० च्या आत नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. ही काळजी घेतल्यास कोणताही धोका उद्भवत नाही.
महाराष्ट्रात नेत्ररोगतज्ज्ञ सोसायटीने ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’चे वेळीच निदान होऊन नेमकी रुग्णसंख्या समोर येण्यासाठी राज्यात मोठी मोहीम उघडली आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या नेत्ररोगतज्ज्ञांद्वारा मधुमेहींच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली जात आहे. यातून हाती येणारी माहिती व रुग्णांची संख्या नंतर राज्य सरकारला सादर केली जाणार आहे.
नेत्रतज्ज्ञांकडे केव्हा जावे ?
- शून्य ते ३० वर्ष वयोगटात मधुमेहाचे निदान झाल्यावर लगेच- गर्भावस्था असल्यास दर तीन महिन्याने- रेटिनावर अंशत: दोष असल्यास दरवर्षी, काही प्रमाणात दोष असल्यास दर महिन्याने- लेसर उपचार केले असल्यास दर २ ते ३ महिन्याने
वार्षिक तपासणी करा...
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी. ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ची प्राथमिक लक्षणे काहीच नाहीत. हा आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात आला तर तो बरा होत नाही. याचे रुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ सोसायटी व जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात मधुमेहींच्या डोळ्यांची नेत्ररोगतज्ज्ञांद्वारा मोफत तपासणी केली जाणार आहे, असे जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ. चेतन पाटील यांनी सांगितले.
कुठे कराल मोफत तपासणी :
दि. २७ रोजी :- डॉ. श्रुती चांडक : भास्कर मार्केटजवळ : सकाळी ९ ते दुपारी १- डॉ. धर्मेंद्र पाटील : जानकीनगर, नेरीनाकाजवळ : सायंकाळी ५ ते रात्री ८
दि. २८ रोजी :- डॉ. चेतन पाटील : ओंकारनगर, बीएसएनएलसमोर : सकाळी ९ ते दुपारी १- डॉ. मोहित भारंबे : पांडे चौक : सायंकाळी ५ ते रात्री ८
दि. २९ रोजी :- डॉ. अनुप येवले : सरदार पटेल लेवा भवन जवळ, बीएसएनएलमागे : सकाळी ९ ते दुपारी १- डॉ. अंकुश कोलते : सायंकाळी ५ ते रात्री ८