- अजय पाटील जळगाव : संपूर्ण जळगाव शहरातील सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने ते थेट तीन नाल्यांद्वारे गिरणा नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून मंजूर असून, हा प्रकल्प सुरू व्हायला चार ते पाच वर्षांचा काळ लागणार आहे. तोपर्यंत नदीचा नाला असाच वाहता राहणार आहे.
जळगाव शहराला एका दिवसात जवळपास १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. त्यातून निम्मे पाणी हे सांडपाण्याच्या माध्यमातून गटारीत सोडले जाते. लेंडी, दवंड्या व गुंजारी या तीन नाल्यांद्वारे हे सर्व सांडपाणी थेट गिरणेच्या पात्रात जाते. आधीच बेसुमार वाळू उपसा सुरू असताना या सांडपाण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणीही गिरणेत जात आहे. शिवाय आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणीही गिरणेतच जाते. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना पर्यावरणवादी संघटनांचे. नदीकाठच्या गावकऱ्यांनाही या प्रश्नाचे देणेघेणे राहिले नाही. जलप्रदूषणामुळे देशी-विदेशी पक्ष्यांची जत्रा भरणाºया गिरणा काठावर आता पक्ष्यांचे थवे दिसेनासे झाले आहेत.
पाच प्रकारचे मासे गिरणा नदीत सापडायची. यातील एक-दोन प्रजातीच शिल्लक असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. शहराचे वैभव समजल्या जाणाºया मेहरूण तलावाचे सुुशोभीकरण होत असताना, परिसरातील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात आहे.कधीकाळी आकाशाच्या प्रतिबिंबाने निळेशार दिसणारे तलावाचे पाणी या सांडपाण्यामुळे काळेशार झाले आहे. ६२ हेक्टरमध्ये पसरलेल्या आणि एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या तलावाची आज वाईट अवस्था आहे.
वाघांच्या अधिवासाचा साक्षीदार असलेला या तलावाच्या परिसरातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे. पंधरा ते वीस सापांच्या प्रजातींचा अधिवास असलेल्या क्षेत्रात आज सात प्रजाती आढळून येतात़ ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध कीटक सापडतात. मात्र, जलप्रदूषणामुळे हे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या तलावाच्या सुशोभिकरणापेक्षा शुध्दीकरणाची गरज असल्याचे मत भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
केळीचे क्षेत्र धोक्यात
या परिसरात जवळपास ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. बेसुमार वाळू उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनच गिरणा पट्ट्यातील बोअरवेल्स आटतात. त्यामुळे केळीसाठी ओळखल्या जाणाºया सावखेडा ते पळसोदपर्यंतच्या भागातील केळीचे उत्पादन कमी होत आहे.
सांडपाण्यात विषारी बॅक्टेरिया असतात. नद्यांमध्ये हे पाणी मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. कंपन्यांमधील विषारी रसायन पाण्यात सोडल्यामुळे नदीमधील जीव जंतू व मासे मरण्याची शक्यता असते.- डॉ. एस. टी. इंगळे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
शहरासाठी मलनिस्सारण योजना मंजूर झाली आहे. काही वर्षांनंतर गिरणेत शहराचे सांडपाणी न जाता त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी त्या पाण्याचा वापर केला जाईल. ही योेजना पूर्ण होत नाही तोपर्यंत गिरणेत जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल का, यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे.- डॉ. उदय टेकाळे, आयुक्त, महापालिका, जळगाव
आरोग्यालाही धोका
गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा, आमोदा ते गाढोदा अशा ४० कि.मी.च्या गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील आव्हाणे, आव्हाणी, भोकणी या गावांमध्ये प्रत्येक वर्षी अतीसाराची साथ वाढते आहे.
सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाणार
शहरासाठी अमृत अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५० कि.मी.चे, तर दुसºया टप्प्यात २५० कि.मी.चे काम होणार आहे. या कामाला किमान चार ते पाच वर्षे लागणार आहेत. या प्रकल्पात सर्व सांडपाण्यावरप्रक्रिया होऊन ते शेतीसाठी वापरले जाणार आहे.