जळगाव : मेहरुणमधील वॉर्ड क्र. चा १४ गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मक्तेदार सूरज नारखडे यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला आहे. आता या कामाचा मार्ग मोकळा झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच हे काम होणार आहे.
मेहरुणमधील गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दोघांनी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सर्वात आधी २०२२ मध्ये मनपाच्या निविदेनुसार आपल्यालाच प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा दावा या रस्त्याचे काम आपल्यालाच मिळावे, सार्वजनिक बांधकाम विभागाला मनाई करावी यासाठी नारखेडे यांनी ॲड.प्रदीप कुळकर्णी यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. महानगरपालिका, बांधकाम विभाग यांनी सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली. महापालिकेनेही प्रशासकीय मान्यता रद्द केल्याचे न्यायालयात सांगितले. या सर्व बाजु पाहता न्यायालयाने नारखेडे यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.