शिवाजीनगर उड्डाणपूल : जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही दोन दिवसांत खुला करण्यात येणार
जळगाव : सध्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम बंद असल्यामुळे, नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित मक्तेदारातर्फे शिवाजीनगरकडून रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता बुधवारपासून खुला करण्यात आला आहे, तर रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही येत्या दोन दिवसांत खुला करण्यात येणार आहे.
शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे पुलाचे काम बंद पडले आहे. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी संबंधित मक्तेदाराने गेल्या एक वर्षापासून जे रस्ते बंद केले आहेत, ते रस्ते पुन्हा उघडण्यात यावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली होती. यावेळी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाचे सुरू असलेले विलंबाने काम व यामुळे नागरिकांना शिवाजीनगरात जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी करून
त्यांनीदेखील तातडीने बंद केलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी नागरिकांना पायी जाण्यापुरता रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी संबंधित मक्तेदारातर्फे शिवाजीनगरच्या बाजूने एक रस्ता उघडण्यात आला आहे.
इन्फो :
जिल्हा परिषदेसमोरील रस्ताही दोन दिवसांत खुला करणार
संबंधित मक्तेदाराने बुधवारी शिवाजीनगरच्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता खुला केला आहे. या ठिकाणचे लोखंडी पत्रे बाजूला करून, पादचारी नागरिक व दुचाकीस्वार नागरिकांना जाता येणार आहे. हा रस्ता खुला केल्यामुळे नागरिकांचा कान्हळदा रस्त्यामार्गे साधारणतः अर्ध्या किलोमीटरचे अंतर पार करून येण्या-जाण्याचा त्रास वाचला आहे, तसेच या रस्त्यानंतर आता रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ताही वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे हा रस्ताही येत्या दोन दिवसांत सुरू करण्याबाबत मक्तेदाराने सांगितल्याचे सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितले.