ऑनलाईन लोकमत
धरणगाव,दि.6- येथील विवरे-भोरकडे रस्त्यालगत नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सद्गुरू समर्थाची बैठक एका निसर्गरम्य जागेत होते. शेकडो भाविक या बैठकीला जातात. मात्र, पावसाळ्यात तेथे जाण्यास भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने शिवसेनेने श्रमदान करून दीड किलोमीटरचा रस्ता तयार केला. यामुळे समर्थ भक्तांना बैठकीला जाण्याचा रस्ता सुकर झाला आहे.
येथील किकाभाई अॅण्ड सन्स यांच्या डेपोकडे जाणा:या रस्त्याकडे नानासाहेब धर्माधिकारी संचलित सद्गुरू समर्थ सेवेक:यांची बैठक शेतात बांधलेल्या शेडमध्ये होते. पावसाळ्यात या कच्च्या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे भाविकांना बैठकीला जाणे जिकरीचे होत होते.
यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या कानावर ही माहिती आली. या रस्त्याबाबत शिवसेनेने मातोश्री स्टोन क्रशर, जयश्री दादाजी सप्लायर्सचे मोहन महाजन, नगरसेवक विनय भावे, संजय महाजन, कांतीलाल महाजन, नगराध्यक्ष सलीम पटेल, नगरसेवक वासुदेव चौधरी, प्रशांत देशमुख, विलास महाजन आदींशी चर्चा करून एकूण पाच डम्पर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे जेसीबी मागवून सुमारे 90 ब्रास मुरूम, डबर टाकून रस्ता तयार केला.
शासनाचा तीन लाख रुपये खर्च वाचला
शासनाच्या निधीतून हा रस्ता न करता राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसैनिकांना 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारणाची आठवण करून देत प्रोत्साहन दिले व त्यामुळे शिवसैनिकांनी श्रमदानातून दीड कि.मी.चा रस्ता साकारला. या कामासाठी शासनाचा लागणारा तीन लाख रुपये खर्च वाचला आहे.