जळगाव : महामार्गावर विद्युत कॉलनी ते प्रभात चौक हा रस्ता सध्या चांगलाच अडचणीचा ठरला आहे. कामे आता वेगाने सुरू असली तरी त्यात सातत्याने बदल होत आहेत. प्रभात चौकातील अंडरपासच्या उंचीचा विषय या आधी देखील गाजला होता. आता या चौकातील अंडरपासची कमी रुंदी हा विषय देखील गाजत आहे. येथे सहा मीटर ऐवजी आणखी मोठा करण्याची मागणी होत आहे. थोड्याशा पावसानंतरही अग्रवाल चौकात चिखल साचला आहे.
अग्रवाल चौक
मुळ आराखड्यात अग्रवाल चौकात अंडरपास नव्हता. मात्र स्थानिक संस्था आणि राजकारणी यांच्या आग्रहानंतर अंडरपास करण्यात आला. त्याची रुंदी फक्त ६ मीटरच आहे. भविष्यात या ठिकाणी रहदारी वाढण्याची शक्यता आहे. सध्या या चौकात काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. येथे पाणी वाहुन जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने शुक्रवारी झालेल्या पावसानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत येथे चिखल होता. वाहन चालवतांना कसरत करावी लागत होती. तसेच अनेक ठिकाणी खड्डे आहेत. हे पाण्यामुळे लक्षात येत नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर वाहने घसरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच विद्युत कॉलनी चौका पासून अग्रवाल चौकापर्यंत वळण घेण्यास रस्ताच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिसरात आयएमआरकडून महामार्गावर येणारी रहदारी जास्त आहे. त्यामुळे येथूनच या भागात उतरण्यासाठी रस्ता असावा, अशी मागणी होत आहे. तसेच विद्युत कॉलनी चौका पासून अग्रवाल चौकापर्यंत वळण घेण्यास रस्ताच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिसरात आयएमआरकडून महामार्गावर येणारी रहदारी जास्त आहे. त्यामुळे येथूनच या भागात उतरण्यासाठी रस्ता असावा, अशी मागणी आहे.