यावल : शहरालगतच्या आयशानगर या वस्तीसह विस्तारित वस्त्यांमध्ये रस्ते व गटारी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. सध्या पावसामुळे या भागांमध्ये चिखलच चिखल निर्माण झाल्याने रहिवशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्यांविषयी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशपाक शाह व वस्तीतील रहिवाशांनी येथील नगरपालिकेसमोर उपोषण केले होते. त्यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी लवकरच रस्त्याचे काम करून देणार असल्याचे आश्वासन देऊन रहिवाशांचे उपोषण मागे घेतले होते. मात्र, अद्यापही नगराध्यक्ष यांचे आश्वासन पूर्ण न होता रस्त्याच्या व गटारीच्या कामास सुरुवात झालेली नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने रस्त्याची स्थिती अत्यंत खराब होऊन रस्त्यात जागोजागी डबके साचले असल्याने रहिवाशांना पायी चालणेही कठीण होत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नाही तर पुन्हा पालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा अशपाक शहा व इरफान शेख, हाजी बद्रौद्दीन, जुनेद खान, वसीम पटेल, डॉ. सोहेल, अजीज पटेल आदींनी दिला आहे.