दुरुस्तीसाठी अर्ध्या विटांचा वापर : या दुरुस्तीपेक्षा खड्डेच परवडले; मनपा प्रशासनाचे करायचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील नागरिक गेल्या चार ते पाच वर्षांपासून खराब रस्त्यांनी त्रस्त आहेत. अमृत योजनेच्या नावावर खापर फोडून मनपातील तत्कालीन व विद्यमान सत्ताधाऱ्यांनीदेखील नागरिकांच्या संतापाला काहीअंशी उद्रेक होण्यापासून थांबविले असले तरी आता शहरातील चालण्यायोग्यही नसलेल्या रस्त्यांवरून जळगावकरांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. आता मनपाने रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली जळगावकरांची थट्टा सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खड्ड्यांमध्ये डांबर, खडीव्यतिरिक्त थेट अर्ध्या विटा व घरांचे वेस्टेज माल टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसाळ्यात चिखल तर पाऊस संपला की धुळीच्या समस्येचा सामना जळगावकरांना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुरुस्ती जर अर्ध्या विटा व काळी मातीसदृश मुरूम टाकून सुरू असेल तर अशा प्रकारच्या दुरुस्तीपेक्षा खड्डेमय रस्ते तरी परवडले असेच म्हणण्याची वेळ आता जळगावकरांवर आली आहे.
अर्ध्या विटांमुळे रस्त्यांवरून वाहन चालविणेही कठीण
खड्डेमय रस्त्यांमुळे तर वाहन चालविणे कठीणच आहे. त्यात ज्या ठिकाणी खड्डे आहेत, त्याठिकाणी खडी किंवा मुरूम न टाकत अर्ध्या विटांचा खच टाकला जात आहे. यामुळे त्या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे जिकिरीचे होत जात आहे. या विटांवरून वाहने अक्षरश: घसरत आहेत, तर काही ठिकाणी तर वाहनधारक विटा टाकलेल्या रस्त्यावरून न जाता इतर रस्त्याचा वापर करत आहेत. म्हणजेच विटा टाकून मनपाने सुरू केलेले दुरुस्तीचे काम हे जळगावकरांना न परवडण्यासारखे आहे.
काळी मातीसदृश मुरमाचा वापर
शहरातील काही रस्त्यांवर काळी मातीसदृश मुरमाचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. जुन्या बीजे मार्केट परिसरात काळी मातीमिश्रित मुरूम टाकल्यामुळे पाऊस झाल्यास हा मुरूम रस्त्यावर पसरल्यास नागरिकांची सोय कमी व गैरसोयच जास्त होणार आहे. यासह कानळदा रस्त्यालगत तर मनपाने नाल्यामधील गाळ काढून थेट रस्त्यावर टाकून दिला आहे. पाऊस नसल्याने या गाळावरून वाहने ये-जा करत असली तरी पाऊस झाल्यानंतर या गाळामुळे या रस्त्यांवरून बैलगाडीचेदेखील जाणे कठीण होऊन जाते.
आमदारांच्या कार्यालयासमोर मात्र डांबराने दुरुस्ती
शहरातील रस्त्यांवरून दगड, माती व विटांचा वापर करून रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना, दुसरीकडे शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या कार्यालयासमोरील रस्त्याची दुरुस्ती मात्र खडी, कच व डांबरने केली जात आहे. एकीकडे वेगळा न्याय व दुसरीकडे वेगळा न्याय का, असा प्रश्न आता जळगावकर उपस्थित करत आहेत. दरम्यान, यासंदर्भात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.