जळगाव : मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात ३ फेब्रुवारी रोजी पडलेला सशस्त्र दरोडा हा पोलीस यंत्रणेला आव्हान देणारा ठरला आहे. या घटनेला १२ दिवस उलटले आहेत, परंतु अजूनही कोणताच धागा पोलिसांना गवसलेला नाही. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले आहे. खबऱ्यांचे नेटवर्क कमी झाल्याने या गुन्ह्याची मदार आता फक्त तंत्रज्ञानावरच अवलंबून आहे.
दोन महिन्यांपासून घरफोड्या, बॅगा लांबविणे, सोनसाखळी लांबविणे यासारख्या घटनांनी डोके वर काढलेले आहे. त्यापैकी एकही गुन्हा उघडकीस आलेला नसतानाच सशस्त्र दरोड्याची घटना घडली.
३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.१५ ते ४ असा पाऊण तास थरार या बंगल्यात सुरू होता. या भागात मोहाडी रस्त्यावर सकाळी चार वाजेपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी असते, त्यातही वाळूची अवैध वाहतूक रात्रीच मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन चालते. दरोडा पडला ते घर रस्त्याला लागूनच आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद आहेत. इतके सारे पुरावे असतानाही पोलिसांना कुठलाच धागा गवसलेला नाही. रामानंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे तर गुन्हे उघडकीस आणण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तंत्रज्ञानाचीही जोड या विभागाकडे आहे. परंतु, गुन्हा उघडकीस आणण्यात यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते आहे, की मानसिकताच राहिलेली नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे. सर्वच पर्याय संपल्याने आता फक्त तंत्रज्ञान हे अस्त्र पोलिसांकडे उरले आहे.
खुनाचे आरोपी तर सोडाच मयताचीही ओळख नाही
सावखेडा शिवारात जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा खून होऊन सहा महिने होत आलेले आहेत. हा खून कोणी केला हे तर सोडाच, परंतु खून झालेली व्यक्ती कोण आहे याचाही पोलीस शोध लावू शकलेले नाहीत. तालुका पोलिसांनी पांढरे कागद काळे केले, स्थानिक गुन्हे शाखेने हजेरी लावली, पुढे काहीच नाही. मृत व्यक्ती शोधता आला तर मारेकरीही शोधणे अवघड नाही, पण या गुन्ह्यातूनही यंत्रणेने अंग काढून घेतले आहे. खरं तर हा गुन्हा पोलिसांसाठी आव्हान आहे. यात एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. जाब विचारणारेही कोणी नाही, वरिष्ठांना आढावा घ्यायला वेळ नाही म्हणूनच या गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकत नाही.
घरफोडी व बॅगा लांबविण्याच्या घटनांचा तपास शून्य
दरोडा पडला त्याच्या आदल्याच दिवशी शहरात एकाच दिवशी तीन घरफोड्या झाल्या. मानराज पार्कमधील द्रौपदी नगरात चार लाखांची, अयोध्या नगरात ६० हजारांची, तसेच टेलिफोन नगरातही घरफोडी झाली होती. इच्छादेवी पोलीस चौकीला लागूनही किराणा दुकान फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविण्यात होता. त्याआधी शनी मंदिरात दर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्याच्या दुचाकीची डिक्की उघडून १ लाख ६० हजारांची रोकड लांबविण्यात आली. त्यानंतर सालार नगरात वकिलाच्या दुचाकीतून अडीच लाखांची रोकड लांबविण्यात आली. यापैकी एकही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक असो की स्थानिक गुन्हे शाखा या दोन्ही यंत्रणा कुचकामी ठरल्या असून चोरटे त्यांच्यावर वरचढ ठरल्याची दिसून येत आहे.