फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पैशांच्या लालसेने पुतण्यानेच गुन्हेगार मित्रांच्या मदतीने काकाच्या घरात दरोडा घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांचा पुतण्या सनी इंदरकुमार साहित्या (२५, सिंधी काॅलनी), राकेश शिवाजी सोनवणे (३५,रा. देवपुर,धुळे) उमेश सुरेश बारी (२५, रा.चर्चच्या मागे, जळगाव), मयुर अशोक सोनवणे (३५ जळगाव) व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (३४,रा. जामनेर) या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांचे बंधू प्रकाश साहित्या यांच्या घरी १७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता चार जणांनी पिस्तूल व चाकू सारख्या शस्त्राने धाक दाखवून दरोडा टाकला होता. यावेळी लहान बालकांच्या डोक्यावर पिस्तूल रोखून वंशिका साहित्या यांना कपाटे उघडायला लावली होती, मात्र त्यादिवशी घरात रोकड व दागिने नव्हते. संशयित लागलीच माघारी फिरले होते. सर्व जण सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाले होते.
असा रचला कट
इंदरकुमार साहित्या व प्रकाश साहित्या हे दोन्ही भाऊ सिंधी काॅलनीतील स्वाॅमी टाॅवरमध्ये वास्तव्यास आहेत. तर खुबचंद साहित्या दुसरीकडे वास्तव्याला आहेत. इंदरकुमार यांचा मुलगा सनी याला असलेले वेगवेगळे व्यसन व त्यातून तो कर्जबाजारी झाला होता. काका प्रकाश साहित्या यांच्या घरात नेहमी ३५ ते ५० लाखाच्या घरात रोकड असते, अशी पक्की माहिती सनी याला होती. पटकन पैसे कमविणे व कर्जातून मुक्तता मिळेल, यासाठी सनी याने राकेश सोनवणे या गुन्हेगार मित्राची मदत घेऊन काकाच्या घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानुसार राकेशने इतर तिघांना बोलवून त्याचे नियोजन केले. ठरल्यानुसार १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा दरोडा टाकला, परंतु त्यांच्या हातात काहीच लागले नाही.
सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समजताच चौघांनी जाळले कपडे
दरोडा टाकल्यानंतर चौघे संशयित तेथून निघाल्यानंतर इच्छा देवी चौकात एकत्र आले. दोन जण वेगवेगळे रिक्षाने तर दोन जण चारचाकीने रवाना झाले. या घटनेनंतर सनी हा थोड्यावेळाने घटनास्थळी आला होता. कुटुंबातील लोकांची मन:स्थिती कशी आहे? पोलिसांचा कल काय आहे? याची तो माहिती घेत होता. संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे कळताच त्याने कपडे जाण्याचा सल्ला चौघांना दिला.
रेकी करून नकाशा दिला हातात
सनी याने दरोड्याचे नियोजन केल्यानंतर चौघांना रेकी करून बाहेरून घर दाखवले होते. त्यानंतर घरात पैसे व दागिने कुठे आहेत याबाबतचा नकाशा तयार करून संशयितांच्या हातात दिला होता. याच वेळी काम करताना कुटुंबातील कुणालाच मारहाण करायची नाही अशी ताकीदही त्याने चौघांना दिली होता. दरम्यान, राकेश सोनवणे याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दोन तर एक बीड पोलीस ठाण्यात आहे. बारी याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या पथकाने उघडकीस आणला गुन्हा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजय देवराम पाटील, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, सुनील दामोदरे, नरेंद्र वारुळे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, दिनेश बडगुजर, श्रीकृष्ण पटवर्धन, संदीप सावळे,प्रदीप पाटील, जयंत चौधरी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, मुरलीधर बारी व दर्शन ढाकणे या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.