जळगाव : गुरुवारी दिवसाढवळ्या जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये दोन जणांनी दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून बँकेतून सुमारे १७ लाख रुपयांची रक्कम आणि साडेतीन कोटींचे सोने घेऊन पसार झाले आहेत. सकाळी ९:३० ते १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हेल्मेट घातलेल्या दोन दरोडेखोरांनी स्टेट बँकेमध्ये प्रवेश केला. सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्यांना चाकूच्या जोरावर बंधक बनविले. नंतर बँक व्यवस्थापकालादेखील मारहाण केली. कॅश रूम उघडल्यावर व्यवस्थापक आणि एका दरोडेखोरामध्ये झटापट झाली. त्यात दरोडेखोराने व्यवस्थापकाच्या पायावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. नंतर १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले, तसेच दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरसुद्धा सोबत नेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तपासाला वेग दिला. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून तपासले जात आहेत.