सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सद्य:स्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली फेस्टिव्हल आणि स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात आहे. विशेष गाडी व फेस्टिव्हल गाडीचे तिकीट दर हे वेगळे असल्याने, विशेष गाडीला जळगाव ते चाळीसगावपर्यंत स्लीपरचे भाडे १७५ रुपये तर फेस्टिव्हल गाडीला ४१५ रुपये भाडे असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कोरोनामुळे काही महिने रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने सेवा सुरू करून, पॅसेंजर गाड्या वगळता आतापर्यंत ८० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना सुरुवातीपासून विशेष व उत्सव गाड्यांचा दर्जा दिला आहे. हा दर्जा देताना जनरल तिकीट बंद ठेवले आहे. आरक्षण असणाऱ्या प्रवाशानांच प्रवास करण्याची सक्ती केली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून २० ते ५० टक्क्यांपर्यंत तिकिटाच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.
इन्फो
०१०६१ पवन एक्सप्रेस
०१०७१ कामायनी एक्सप्रेस
०२५३८ कुुशीनगर एक्सप्रेस
०१०५७ अमृतसर एक्सप्रेस
०२१०५ विदर्भ एक्सप्रेस
०२१९३ महानगरी एक्सप्रेस
०२१६९ सेवाग्राम एक्सप्रेस
इन्फो :
२० ते ५० टक्क्यांपर्यंत तिकीट जास्त
- रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात सुरू केलेल्या या गाड्यांना विशेष आणि फेस्टिव्हलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या गाड्यांना
२० ते ५० टक्क्यांपर्यंत जादा तिकीट वाढ लागू केली आहे.
- तसेच या गाड्यांना जनरल तिकीट बंद ठेवले असून, आरक्षणाची सक्ती करण्यात आली आहे. तिकीट आरक्षण असणाऱ्या प्रवाशांना प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे.
- विशेष गाड्यांच्या स्लीपर आणि साध्या तिकिटामध्ये २० ते २५ टक्के दरवाढ असून, फेस्टिव्हल गाड्यांना ५० टक्क्यांपर्यंत जादा तिकीट दर आहे.
इन्फो
प्रवासी वैतागले ..
रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या गाड्यांना विशेष आणि फेस्टिव्हलचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, सध्या कुठलाही सण-उत्सव नसतांना या फेस्टिव्हल गाड्यांना जादा तिकीट दर आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत असून, सर्व गाड्यांचा दर्जा हा पूर्वीप्रमाणे करणे गरजेचे आहे.
तुषार देशमुख, प्रवासी
सध्या जनरल तिकीट बंद असल्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागत आहे. पूर्वी जळगाव ते चाळीसगावचे स्लीपरचे भाडे सव्वाशे रुपयांपर्यंत असायचे. आता हेच भाडे विशेष गाडीला १७५ रुपये तर फेस्टिव्हल गाडीला ३८५ ते ४१५ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे प्रवाशांची एक प्रकारे लूटच सुरू आहे.
योगेश पाटील, प्रवासी