लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी कोविड रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट होत असून, खासगी रुग्णालये प्रतिदिन ५०० ते ६०० या प्रमाणे रुग्णांकडून शुल्क आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी या तक्रारीसोबत काही रुग्णालयांची बिलेही जोडली आहेत.
बायोमेडिकल वेस्ट अर्थात जैविक कचरा, यात सलाईन, इंजेक्शन, रुग्णाला वापरलेले साहित्य यांचा समावेश येत असतो. दरम्यान, खासगी रुग्णालयांचे शुल्क निश्चित करताना प्रशासनाने ५०० ते ६०० रुपये कोविड रुग्णांकडून घेण्याचे प्रावधान असताना आपल्याकडे आलेल्या तक्रारीनुसार रुग्णांकडून ५०० ते ६०० रुपये प्रतिदिन या बायोमेडिकल वेस्टसाठी शुल्क आकारले जात आहे.एका रुग्णालयात ५० रुग्ण असल्यास २५ हजार रुपयांची वसुली खासगी रुग्णालयांकडून एका दिवसाची होत असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. रुग्णांकडून पाच हजार ते १५०० रुपयांपर्यंत शुल्क यात वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही लूट थांबवावी आणि बेड चार्ज जे ठरवून दिले आहेत, त्यातच बायोमेडिकल वेस्टच्या चार्जचा समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांना पाठविले आहे.