जळगाव : पांडे चौकातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या ९ अट्टल गुन्हेगारांना रविवारी सकाळी साडे पाच वाजता मेहरुण तलावाच्या परिसरात पकडण्यात आले. त्यांच्याजवळ १ गावठी पिस्तुल, दोन चॉपर, नायलॉन दोरी, लाकडी दांडके, लोखंडी आसारी व लाल मिरची पावडर असे साहित्य आढळून आले. या सर्वांविरुध्द दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्यांमध्ये मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (१९),मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (२१),गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी (२०) रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (२१),टिपु उर्फ बहिऱ्या सलीम शेख (२२),(रा.तांबापुरा)पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (२२), सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव (२२), रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (१९) व खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे (२४) यांचा समावेश आहे.कोम्बीग आॅपरेशनमुळे सापडले संशयितविशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाने २७ फेबु्रवारी ते १० मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशाने शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ६ या वेळेत कोम्बीग आॅपरेशन राबविण्यात आले.ही मोहीम सुरु असताना सकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मेहरुण तलावाच्या परिसरात शेतीला लागून काही संशयित लपलेले व त्यांच्याजवळ शस्त्र असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार शिरसाठ यांनी उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दिनकर खैरनार, नितीन पाटील, दीपक चौधरी, अशोक सनगत, गोविंदा पाटील, सतीश गर्जे, सचिन पाटील, मुदस्सर काझी व भूषण सोनार यांना सोबत घेऊन मेहरुण तलाव गाठला असता संशयित पोलिसांना पाहून झाडांच्या आडोशाला लपले,मात्र पोलिसांनी त्यांना घेरुन ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तुल, दोन चॉपर, दोरी, लाकडी दांडा, लोखंडी सळई व मिरची पावडर आढळून आले.दरम्यान, अटकेतील सर्वच गुन्हेगारांवर चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी, मारामारी, विनयभंग, दंगल व शस्त्र बागळणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.यातील बावरी बंधू नुकतेच कारागृहातून जामिनावर बाहेर आले आणि आता परत दरोड्यच्या गुन्ह्यात अडकले.- पोलिसांनी सर्व नऊ संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यातील मोनुसिंग बावरी याने न्यायालयात प्रवेश करताना संताप व्यक्त करुन भींतीवरील खिडकीचा काच फोडला. पोलिसांनी त्याला लागलीच सावरले. दरम्यान, मोहनसिंग बावरी वगळता सर्व आठ जणांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोहनसिंग याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरोड्याचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 11:47 AM