मुंबई - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात स्वत: रोहिणी यांनी ट्विटवरुन माहिती दिली. त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपला धक्का देत रोहिणी यांनी त्याचे वडिल एननाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसेंन म्हटले की, 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,' असं आवाहनही त्यांनी केलंय. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
भाजपात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून नाराज असल्याने अखेर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, त्यांच्यासमवेत रोहिणी खडसेंनीही भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे.